
गंभीर बनलेला कुवारबावचा कचरा प्रश्न आता पेटणार घनकचरा जागा हस्तांतरणाबाबत चालढकल सुरू रत्नागिरी प्रतिनिधी
कुवारबाव ग्रामपंचायतच्या घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी ची जागा रेखांकनात आरक्षित असूनही ती ग्रामपंचायतकडे हस्तांतरित करण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चालढकल होत असल्याने येथील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आता ग्रामस्थ या कचरा प्रकल्पासाठी सामुदायिक आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याने कचऱ्याचा प्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नामदार उदय सामंत यांनी या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कुवारबाव हे रत्नागिरी शहराचे राष्ट्रीय महामार्गावरील उपनगर बनले असून गेल्या 25 ते 30 वर्षात या परिसरात नवीन गृहनिर्माण वसाहती, गृहनिर्माण संकुले मोठ्या प्रमाणात उभी राहिल्याने येथील लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. बाजारपेठ आणि व्यापारी दुकानदारही वाढत आहेत. त्यामुळे निर्माण होणारा कचरा परिसरात उघड्यावर टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी वाढली असून डासांची उत्पत्ती सुद्धा वाढली आहे. शिवाय मोकाट श्वान, मोकाट गुरांचा उपद्रव वाढत आहे. सर्व व्यापारी आणि दुकानदार ही आपला कचरा नागरी वस्तीच्या शेजारी पत्रकार कॉलनी जवळ उघड्यावर आणून टाकत आहेत. ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावून ही त्यांना दाद दिली जात नाही, की ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा सवाल विचारला जात आहे.
याप्रकरणी कुवारबाव ग्रामपंचायतीने 25 जून 2023 च्या पत्राने सादर केलेल्या प्रस्तावानुसार कचरा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाने दिनांक ८ जुलै 2024 च्या पत्राने करून जागा हस्तांतरित न झाल्यास 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन निवेदनाची साधी पोहोचही दिली नाही. मात्र पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी रत्नागिरी जवळील स्टर लाईट प्रकल्पाच्या जागेत होणाऱ्या सामूहिक कचरा प्रकल्पात कुवारबाव ग्रामपंचायतचा समावेश करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण तूर्तास स्थगित केले गेले होते.
वास्तविक कुवारबाव ग्रामपंचायत हद्दीतील रेखांकनात घनकचरा प्रकल्पासाठी जागा आरक्षित असतानाही आणि तसा स्पष्ट अभिप्राय रत्नागिरी तहसीलदारानी दिनांक 8 ऑगस्ट 2023 च्या पत्राने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असतानाही आणि पालकमंत्री नामदार सामंत यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2023 च्या पत्राने सूचना देऊनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिनांक 11 जून 2024 च्या पत्राने रत्नागिरी तहसीलदारांना पुन्हा एकदा स्वयं स्पष्ट अभिप्राय देण्याविषयी कळविले. मात्र रेखांकनात आरक्षित जागा असतानाही नाहक कागदी घोडे नाचवत ग्रामपंचायतीला हक्काची जागा हस्तांतरित करण्यात दिरंगाई होत असल्याने आता ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. लवकरच सामुदायिक आंदोलनाच्या तयारीत आहेत पालकमंत्री आमदार सामंत यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालून जागा हस्तांतराची कार्यवाही अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे