दिव्यांगांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील -ग्राम विकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम.

रत्नागिरी, :- दिव्यांगांना जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारायला लागू नयेत, शासन योजनेपासून वंचित रहायला लागू नये, यासाठी तालुक्याच्या ठिकाणी शिबीर घेवून जागच्याजागी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ते पात्र ठरले आहेत. आमदार निधी, जिल्हा परिषद सेस निधी, जिल्हा नियोजन समितीमधील निधी असा विविध निधी एकत्रित करुन दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी, उद्योग सुरु करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन ग्राम विकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

पंचायत समिती दापोली, दापोली उपजिल्हा रुग्णालयात राज्यमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या तपासणी शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, तहसिलदार अर्चना बोंबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन सावंत, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, माजी प सभापती चारुलता कामते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर काळे, नगरसेविका कृपा घाग, कृती शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारी आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, 200 किलोमीटर प्रवास करुन रत्नागिरी येथे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जाणे हे शक्य होत नव्हते. अनेक दिव्यांग त्यापासून वंचित राहत होते. गेल्या पाच वर्षापासून तालुक्याच्या ठिकाणी शिबीर घेत आहोत. या शिबीरातून 2 हजार 17 जणांना जागेवरच दाखले मिळाले आहेत. अशा शिबीरांमधून दिव्यांगांना न्याय देण्यात यशस्वी झालो आहे. दापोली, खेड, मंडणगड मधील दिव्यांग योजनांसाठी पात्र होणार आहेत.

दिव्यांगांसाठी ज्या वस्तू लागणार असतील त्या त्यांना सीएसआर निधीमधून मिळवून दिल्या जातील. प्रमाणपत्राप्रमाणेच शस्त्रक्रिया करण्यासाठीही शिबीरांचे आयोजन केले जाईल. उपजिल्हा रुग्णालयामधील उणिवा दूर करण्यासाठी विशेषत: मनुष्यबळ, डॉक्टर्स उपलब्ध होतील यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडे माझा पाठपुरावा सुरु आहे, असेही ते म्हणाले.

सध्याच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला सुरु असणाऱ्या नव्या इमारतीच्या बांधकामाबाबत आवर्जून उल्लेख करुन राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, 50 खाटांच्या रुग्णालयाची इमारत वर्षभरात उभी राहत नसेल, तर ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी नामुष्कीची बाब आहे. अधिकाऱ्यांनी गतिने उभ्या राहिलेल्या अन्य इमारतींच्या बांधकामाचा आदर्श घेवून गतीने काम करावे. वेळेत काम पूर्ण करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला.

यावेळी राज्यमंत्र्यांच्या हस्ते विजय मोरे, श्रध्दा देवघरकर, मनोज गावडे, दिपक जगदाळे आदींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप यांनी या शिबीराबाबत सविस्तर माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिबीराला मोठा प्रतिसाद लाभला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button