
वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर ब्राह्मणच ठरतात’, अभिनेता राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला; वादाची ठिणगी
औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं विधान अभिनेता राहुल सोलापूरकर याने केलं होतं. सोलापूरकर याच्या या विधानावरून राज्यभरात पडसाद उमटले होते.सोलापूरकरचा निषेध म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलनं करण्यात आले. सर्वच राजकीय पक्षांनीही सोलापूरकर याच्या विधानाचा निषेधही नोंदवला होता. तर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोलापूरकरला गोळ्या घालण्याची भाषा केलेली होती. हा वाद अजूनही थांबलेला नसताच सोलापूरकर याने आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे.
वेदांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते, असा जावई शोध राहुल सोलापूरकर याने लावला आहे. सोलापूरकर याने नवीन वादग्रस्त विधान करून पुन्हा एक वाद ओढवून घेतला आहे.रामजी सपकाळ यांच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेले एक भिमराव की जो आंबावडेकर नावाच्या एका गुरुजीकडून दत्तक घेतला जातो. त्याच नावावरून पुढे भिमराव आंबेडकर म्हणून मोठे होतात. त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जस म्हटलं आहे, तसं ते अभ्यास करून मोठे झाले आहेत त्या आर्थाने वेदांमध्ये भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर याने केलं आहे.
दरम्यान राहुल सोलापूरकर याने केलेल्या वादग्रस्त वक्यवानंतर जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही.
आता तर डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील; ते कसे उगवायचे, ते बहुजन अन् आंबेडकरवादी ठरवतील. या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो, हेच समजत नाही. याला दिसेल तिथे तुडवा !! असंट्विट आव्हाड यांनी केलं आहे.