
रत्नागिरी जिल्ह्यातील ९१ जणांनी जिल्हा प्रशासनाची २८ कोटी ४ लाख ७० हजार २३१ एवढी रॉयल्टी थकवली
रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गौणखनिजाचे म्हणजे चिरे, काळा दगड, डबर, माती, वाळू आदींचे उत्खनन करून महसूल विभागाचा स्वमित्वधन (रॉयल्टी) थकवणाऱ्यांना महसूल विभागाने दणका दिला आहे. जिल्ह्यातील अशा ९१ जणांनी जिल्हा प्रशासनाची २८ कोटी ४ लाख ७० हजार २३१ एवढी रॉयल्टी थकवली आहे. संबंधितांनी ३१ मार्चपर्यंत दंडासह थकीत रॉयल्टी भरावी, अशा नोटिसा तहसीलदारांमार्फत बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा खनिकर्म विभागाने याला दुजोरा दिला. गौणखनिज उत्खनानंतरही गेली दोनवर्षे ही थकबाकी आहे. महसूलमंत्र्यांनी महसूल विभागाला थकीत रॉयल्टी तत्काळ वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. गुहागर तालुका वगळता सर्व तालुक्यांमध्ये गौणखनिज उत्खननाची थकबाकी आहे.
खनिकर्म विभागाकडून उत्खननाचा परवाना अनेकांनी मिळवला. काहींनी अतिरिक्त उत्खनन केले आहे त्यांना तहसीलदारांनी दंड केलेला, या दंडाविरुद्ध प्रांतांकडे केलेले अपिल, अपिलानंतरही दंड कायम राहिलेला, अशी ही प्रकरणे आहेत. जिल्ह्यात अशा प्रकारे ९१ जणांनी रॉयल्टी थकवल्याची यादी महसूल विभागाने तयार केली आहे. त्या त्या तहसीलदरांना त्याची माहिती देऊन संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत.