
चिपळूण शिवसेनेतील मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याच्या तयारीत
चिपळूण शिवसेनेतील एक मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असून हा गट येत्या काही दिवसांतच आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकार्यांसह मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश करण्याचे संकेत मिळत आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून सप्टेंबरच्या अखेरीस या गटाचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री शिंदे गटात सहभागी होण्याकरिता चिपळूण शिवसेनेतील काही विद्यमान तसेच माजी पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी एकत्र आले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या 20 तारखेनंतर या सर्व शिवसैनिकांचा एकत्रित मेळावा माजी आमदार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आल्याची कुजबूत शिवसेनेत सुरू झाली आहे. यामध्ये माजी नगरसेवक, नगरसेविकांचा सहभागासह शहरातील विद्यमान पदाधिकारी तसेच माजी पदाधिकारी यांचाही समावेश आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, माजी उपनगराध्यक्ष महंमद फकीर, माजी नगरसेवक मोहन मिरगल, माजी नगरसेविका स्वाती दांडेकर, सई चव्हाण यांच्यासह शहरातील काही विभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच शहर परिसरातील अन्य पदाधिकारी, काही माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी आ. सदानंद चव्हाण उपस्थित राहाणार असल्याचे सांगितले जाते. सद्यस्थितीत शिवसेनेतील काही विद्यमान प्रमुख पदाधिकारी शिंदे गट की ठाकरे गट अशा द्विधा मन:स्थितीत वावरत असून कुंपणावर असलेले काही पदाधिकारी व माजी नगरसेवक देखील अशाच संभ्रमावस्थेत वावरत आहेत.