
चिपळूण येथील नागरिकाची 9 लाखांची फसवणूक
चिपळूण : जीएसटी भरण्यासाठी दिल्लीतील नातेवाईकाच्या अकाउंटवर 9 लाख 894 रुपये पाठवलेले परस्पर हडप केल्याप्रकरणी चिपळुणात वृध्दावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारुख अन्सारी (वय 72, रा. दिल्ली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद जियाउलहक जमील मुल्ला (वय 38, एकता अपार्टमेंट, वाणीआळी चिपळूण) यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जियाउलहक जमील मुल्ला यांचे मित्र अब्दुल कादीर पांगारकर (रा. अंजनवेल, गुहागर) यांनी फारुख अन्सारी यांच्या आयसीआयसीआय बँक न्यू दिल्ली येथील अकाउंटवर 2021 ते 2022 या कालावधीत जीएसटी भरण्यासाठी एकूण 9 लाख 894 रुपये पाठवले होते. परंतु अन्सारी याने जीएसटी न भरता जीएसटीमध्ये भरणा केल्याची खोटी पावती व्हॉटस्अॅप नंबरवर पाठवून दिली. मात्र अद्यापपर्यंत जीएसटी भरला गेला नसल्याचे लक्षात येताच जीएसटी साठीचे पैसे परस्पर लाटण्यात आले आहेत अशी मुल्ला यांची खात्री झाली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फारुख अन्सारी याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कनोजा करत आहेत.