
आर्थिक कारणांमुळे अखेर शिवभोजन थाळीवर संक्रांत!__
राज्याच्या तिजोरीवर पडत असलेला ताण लक्षात घेता शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा यांसारख्या योजना बंद करण्याचा विचार सरकार पातळीवर सुरू आहे. विशेषतः लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा भार हलका करण्यासाठी पुढील आर्थिक वर्षापासून या योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत.मात्र, विरोधी नेत्यांसोबतच सत्ताधारी बाकांवरील नेत्यांनीही या योजना सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर 90 हजार कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार आहे. याशिवाय विविध लोकप्रिय योजनांचाही ताण असल्याने तब्बल दोन लाख कोटी रुपयांची तूट आहे. राज्याचा आर्थिन गाडा सावरण्यासाठी किमान एक लाख कोटींपर्यंतची तूट भरून काढण्याचे आव्हान अर्थ खात्यासमोर आहे. त्यातच, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून 2100 करण्याचे आव्हानही आहे.