
वर्ल्ड रेकॉर्डचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केरळच्या सुपुत्राचा एकचाकी सायकलवरून कन्याकुमारी ते काश्मीर प्रवास
चाकोरीबद्ध आयुष्य न जगता आव्हानात्मक काहीतरी करायचे याच जिद्दीने वर्ल्ड रेकॉर्डचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केरळच्या सुपुत्राने कन्याकुमारी ते काश्मीर असा सायकल प्रवास सुरू केला आहे. विशेष म्हणजे ही सायकल तो एका चाकावर चालवत असून आतापर्यंत त्याने ३ हजार कि.मी. अंतर पूर्ण केले आहे. प्रवासादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जातेवेळी चिपळूणवासियांनी या तरूणाचे विशेष असे स्वागत केले.मुळचा केरळ राज्यातील कन्नूर येथील असलेला सनीद हा अवघा २३ वर्षांचा आहे. तो ९ ते १० वर्षापासून सायकल स्टंट करत असल्याने केरळ राज्यात त्याची तशी ओळख आहे. शिवाय सोशल मिडियावर त्याची विशेष क्रेझ आहे. याच पॅशनमधून वर्ल्ड रेकॉर्डचे स्वप्न बघितलेल्या सनीदने कन्याकुमारी ते काश्मीर असा सायकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे हा प्रवास सायकल मागील एका चाकावर चालवत पूर्ण करावयाचा, असे त्याने ठरवले, यातूनच १५ डिसेंबर २०२३ रोजी त्याने कन्याकुमारीपासून प्रवासाला सुरूवात केली.www.konkantoday.com