देशातील ११ कोटी जनतेला आज ही आरोग्य सेवा मिळत नाही. त्यांच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पित करा-डॉ. अभय बंग
देशातील ११ कोटी जनतेला आज ही आरोग्य सेवा मिळत नाही. त्यांच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पित करा, असे आवाहन विचार सामाजिक कार्यकर्ते व सर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. अभय बंग यांनी केले.विनोबा भावे यांनी ‘जय जगत’ या शब्दांचे उच्चारण केले. आज तीच अनुभूती डॉ. विश्वनाथ कराड यांचे विश्व शांतीचे कार्य पाहून होत आहे, असे कौतुकोद्गार देखील त्यांनी काढले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे भारत, पुणे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार २०२५ प्रदान समारंभ पार पडला. त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते.डॉ. अभय बंग म्हणाले, आजचे युग भौतिकवादी जगाकडे पळत आहे, परंतु येथे विज्ञान, अध्यात्म आणि विवेकानंद यांचा संगम पाहताना आनंद होतो. आजचा पुरस्कार हा गडचिरोलीतील सर्व नागरिकांना समर्पित करत आहे.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, समाजासाठी कार्य करणाऱ्या सर्व पुरस्कार्थींचा सर्वांनी आदर्श घेऊन सामाजिक कार्य करावे. भारत अस्मिता पुरस्कार विजेते खऱ्या अर्थाने युवकांचे प्रतीक आहेत. तरुणांनी आपली ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी वापरावी, यासाठी लक्ष केंद्रित करावे. पुरस्कारार्थींनी मनोगते व्यक्त केली. प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. मंगेश कराड यांनी आभार मानले.