दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर, शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय!

दहावी(SSC) आणि बारावीच्या(HSC) परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विशेष पावले उचलली आहेत. राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला असून, त्याद्वारे हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

या उपक्रमाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाला सोपवण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्राबाहेर घडणाऱ्या हालचालींनेही व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. या उपाययोजनांमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे. मागील वर्षी शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) बसवणे अनिवार्य केले होते. त्यासोबतच हा आदेश न पाळणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता.

त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबतच पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांवर लक्ष ठेवण्याची पद्धत स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला राज्यभरातून विरोध झाला. अखेर मंडळाने निर्णय बदलत २०१८ ते २०२४ या काळात ज्या केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघड झाले, त्याच केंद्रांवरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक बदलण्याचा निर्णय घेतला. आता याच सुधारित धोरणानुसार परीक्षेची कार्यवाही करण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांवर विशेष नियोजन करण्यात आले आहे. बारावीच्या ३४ व दहावीच्या ४७ केंद्रांवर पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक अन्य शाळांमधून नियुक्त केले जाणार आहेत. जिल्ह्यात संवेदनशील केंद्र नसल्याने ड्रोन (Drone) कॅमेऱ्यांची गरज भासणार नाही, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी सात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यामुळे परीक्षेच्या व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button