ज्येष्ठ नागरिकांच्या मागणींची पूर्तता संबंधित विभागाने करावी-जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह*
*रत्नागिरी, : शहर ज्येष्ठ नागरिक संघाकडून आलेल्या मागण्यांची पूर्तता संबंधित विभागाने करावी. त्याचबरोबर तृतीयपंथीयांच्या घरकुल मागणीबाबत नगरपरिषदेने शासनस्तरावरुन मार्गदर्शन मागवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
समाजकल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वयक समिती आणि जिल्हास्तरीय तृतीयपंथीयांच्या समस्या निवारण समितीची बैठक आज झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ, पल्लवी माने, महेश्वरी लोहार आदी उपस्थित होते.
सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी विषय वाचन करुन माहिती दिली. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत 29 हजार 530 प्राप्त अर्जांपैकी 21 हजार 150 पात्र आहेत. 6 हजार 9991 जणांना लाभ देण्यात आला आहे. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2010 अन्वये उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्राप्त 28 प्रकरणांपैकी 25 निकाली काढण्यात आले आहे. 3 प्रकरणांवर कार्यवाही सुरु आहे.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांबाबत संबंधित विभागाने दोन आठवड्यात पूर्तता करावी. तृतीयपंथीयांना रेशनकार्ड, आधारकार्ड, आयुष्मान कार्ड देण्याबाबत कार्यवाही करावी. त्यांनी स्थापन केलेल्या बचतगटाला लाभ मिळवून द्यावा.
000