
रत्नागिरी जिल्ह्यातील 60 टक्के शाळांच्या परिसरात बिबट्याचा वावर
रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून शिक्षक बदल्यांसाठी शासनाच्या सात निकषानुसार दुर्गम भागातील शाळांची यादी बनविली आहे. त्यात हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य जखमीचा निकष आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 43 प्राथमिक शाळांचा समावेश झाला. रत्नागिरी, संगमेश्वरसह दापोलीतील सर्वाधिक शाळा आहेत. वनविभागाने दिलेल्या अहवालानुसार 60 टक्के शाळांच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे. यामुळे या शाळा दुर्गम बनणार आहेत. यामुळे यंदा ही यादी वादात सापडण्याची शक्यता आहे. अनेक गावात पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडत आहेत. त्या भागातील शाळांचा समावेश दुर्गममध्ये करा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी यांनी दिले होते. त्यानुसार वन विभागाकडून अहवाल मागविण्यात आला. त्यात 2600 पैकी 60 टक्केहून अधिक म्हणजेच सुमारे 1400 शाळांचा समावेश होऊ शकतो. शहराजवळील काही शाळाही त्यात घ्याव्या लागणार आहेत. नव्याने केलेल्या यादीत सुमारे 650 शाळा असून अंतिम यादी मुख्य कार्यकारी अधिकार्यांबरोबरच्या बैठकीनंतर जाहीर होईल.