कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयभारतरत्न डॉ. पांडुरंग काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र
7,8,9 फेब्रुवारी क्षेत्रीय वैदिक संमेलन
*रत्नागिरी, : महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान, उज्जैन ( शिक्षा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत स्वायत्तशासी संस्था ) आणि कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गौरवशाली वैदिक परंपरेचा वारसा घराघरात पोहोचवण्यासाठी झाडगाव येथील माधवराव मुळे भवनात ७, ८, ९ फेब्रुवारी रोजी क्षेत्रीय वैदिक संमेलन २०२५ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी दिली.
७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत १०० वैदिक मान्यवर सहभागी होणार आहेत. स्थानिक रत्नागिरीकरांचा देखील यात सहभाग असणार आहे. ही शोभायात्रा माधवराव मुळे भवन येथून सुरु होणार असून, जिल्हाधिकारी कार्यालय ते पुन्हा माधवराव मुळे भवन अशी होणार आहे.
यानंतर संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानी कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ धनंजय कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. तसेच गणपतीपुळे संस्थानचे विश्वस्त हरिभाऊ रानडे तथा विवेक भिडे, स्वामी स्वरूपानंद संस्थान पावसचे कार्याध्यक्ष जयंत देसाई, ज्येष्ठ वेद अभ्यासक डॉ. गणेश थिटे आणि विद्वान डॉ. अंबरीष खरे उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ७ वाजता नवोदित गायक श्रीधर पाटणकर यांचा गायन संध्या हा कार्यक्रम पार पडणार आहे. दुसऱ्या दिवशी ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता उपकेंद्राच्या नाट्यशास्त्र विभागाची प्रस्तुती असणार आहे. विशेष आकर्षण म्हणजे माधवराव मुळे भवन येथील मुख्य सभागृह आणि योग कक्ष तसेच कऱ्हाडे ब्राम्हण संघाचे राणी लक्ष्मीबाई सभागृह आणि गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा व श्री वेद पाठशाळा या ५ ठिकाणी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चारही वेदातील विशिष्ट शाखांचे ७ रोजी दुपारी २.३० ते ४.३० आणि ८ व ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ व दुपारी २.३० ते ४.३० सामुहिक पारायण होणार आहे. या वैदिक परंपरेची अनुभूती घेण्यासाठी सर्व वेदप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक डॉ.मराठे यांनी केले आहे.