
कोकण रेल्वेच्या दोन गाड्यांचे डबे वाढले
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन रेल्वेगाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला असून दोन्ही रेल्वेगाड्यांचे प्रत्येकी दोन डबे वाढले आहेत. हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन त्रि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेस आणि हजरत निजामुद्दीन – मडगाव – हजरत निजामुद्दीन द्वि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला प्रथम श्रेणीचा वातानुकूलित डबा आणि तृतीय श्रेणीचा वातानुकूलित डबा असे दोन डबे कायमस्वरूपी जोडण्यात येणार आहेत.कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १२४३२ हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल त्रि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला ४ फेब्रुवारीपासून तर, गाडी क्रमांक १२४३१ तिरुवनंतपुरम सेंट्रल- हजरत निजामुद्दीन त्रि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला ६ फेब्रुवारीपासून डबे जोडण्यात येतील. गाडी क्रमांक २२४१४ हजरत निजामुद्दीन मडगाव द्वि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला ७ फेब्रुवारीपासून तर, गाडी क्रमांक २२४१३ मडगाव- हजरत निजामुद्दीन द्वि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला ९ फेब्रुवारीपासून अतिरिक्त डबे जोडले जातील. या वाढीव डब्यांमुळे या रेल्वेगाडीचे एकूण डबे २० वरून २२ होतील. दोन्ही गाड्यांच्या डब्यांची सुधारित रचना प्रथम श्रेणी वातानुकूलित २ डबे, द्वितीय श्रेणी वातानुकूलित ५ डबे, तृतीय वातानुकूलित १२ डबे, पन्ट्री कार १ आणि जनरेटर कार २ अशी असणार आहे.