
विश्व मराठी संमेलन २०२५ – सांगता समारंभराज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना कलारत्न पुरस्कार
विश्व मराठी संमेलन २०२५ चा सांगता समारंभ राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. या समारंभाला अभिनेते रितेश देशमुख, अभिनेते सयाजी शिंदे, साहित्यिक सदानंद मोरे, उल्हासदादा पवार, लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे, राजेश पांडे, रवींद्र शोभणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मा. राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना “कलारत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी बोलताना सांगितले की,”राज साहेबांच्या हस्ते रितेशचा सत्कार व्हावा, ही आमची इच्छा होती. राज साहेबांबरोबर व्यासपीठावर येण्याचा योग कधीच आला नाही. राजकीयदृष्ट्याही तसा प्रसंग कधी आला नाही, पण आज त्यांना भेटण्याचा योग आला. राज साहेबांचं भाषण त्यांच्या व्यासपीठावरून ऐकण्याची संधी याआधी कधी मिळाली नव्हती. कदाचित म्हणूनच नियतीने मला मराठी भाषा मंत्री केलं असावं. मंत्री झाल्यानंतर राज साहेब येतील आणि हा क्षण घडेल, असा कदाचित नियतीचा योगायोग असावा. मराठीच्या भल्यासाठी, मराठीच्या जतन आणि संवर्धनासाठी ज्या ज्या काही सूचना आपण कराल, ज्या गोष्टी अपेक्षित असतील, त्या करण्याची ग्वाही मी मराठी भाषा मंत्री म्हणून या व्यासपीठावरून देतो.”
हा समारंभ मराठी भाषा, संस्कृती आणि कलाविश्वासाठी एक महत्त्वाचा क्षण ठरला. यावेळी हजारोंच्या संख्येने पुणेकरांनी उपस्थिती दर्शवली होती