
दापोली नगरपालिकेला अग्निशमन बंब नसल्याने नागरिकांची सुरक्षितता अधांतरी.
दापोली नगरपंचायतीची अग्निशमन यंत्रणा नसल्याने येथील नागरिकांची सुरक्षितता सध्या तरी अन्य यंत्रणांवर अवलंबून आहे. त्यातच खेड अग्निशमन बंबाची कालमर्यादा संपुष्टात आल्याने आता सर्व मदार लोटे औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन बंबावर आहे. त्यामुळे पेचप्रसंगात ही यंत्रणा वेळेत पोहचणे कठीण असल्याने दापोलीकरांची धाकधुक वाढली असून नगरपंचायतीला अग्निशमन बंब कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.अत्यावश्यकवेळी खेड येथील अग्निशमन बंब दापोलीसाठी उपलब्ध होत होता.
मात्र खेड अग्निशमन बंबाची कालमर्यादा संपुष्टात आल्याचे समोर येताच आता मोठी आग लागल्यावर काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरासह ग्रामीण भागामध्ये आग लागल्यास नगरपंचायत आतापर्यंत खेड नगर परिषदेचे दार ठोठावत आली आहे. खेड नगर परिषदेच्या बंबाने अनेक ठिकाणी आगी आटोक्यात मदत केली असली तरी खेड येथून बंब येईपर्यंत वेळ गेल्याने आगीत आपत्तीग्रस्तांची मालमत्ता मोठ्या प्रमाणात भस्मसात झाल्याचे समोर आले आहे.
दुसर्या तालुक्यातून लांबून हा बंब येईपर्यंत वेळ लागत असल्याने अनेकदा मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागते. त्यामुळे स्थानिक पातळीवर अग्निशबन बंब असणे गरजेचे आहे. परंतु दापोली नगरपंचायतीकडून मागणीप्रस्ताव दाखल करण्यात येवूनही अद्याप अग्निशमन बंब उपलब्ध झालेला नसल्याचे समोर आले आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.www.konkantoday.com