
कोकाकोला राडाप्रकरणी रामदास कदम यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत विस्तारित टप्प्यातील असगणी येथील कोकाकोला कंपनीत बेकायदेशीरपणे जमाव करत केलेल्या राड्याप्रकरणी शिंदे शिवसेनेच्या १४ हून अधिक पदाधिकार्यांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत कंपनीच्या सुरक्षारक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.असगणी येथे कोकाकोला कंपनी उभारण्याचे काम सुरू आहे.
या कंपनीत स्थानिक तरूणांना सामावून न घेता परप्रांतीयांना स्थान दिले जात असल्याचे निदर्शनास आले. यानंतर संतप्त शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी कंपनीत घुसून परप्रांतीय कामगारांना हुसकावून बाहेर काढत काम बंद पाडले होते. यावेळी कंपनीच्या अधिकार्यांनाही धारेवर धरण्यात आले होते. स्थानिकांना सामावून घेण्याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, अशी तंबी शिवसेनेने कंपनीला दिली होती.www.konkantoday.com