
रत्नागिरी जिल्ह्यात जीबीएस आजाराचाअद्याप कोणताच धोका नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट.
विहिरी, तळे यातील साठलेल्या दूषित पाण्याच्या साठ्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणावर जीबीएस आजाराचा फैलाव झाला. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात या आजाराचा अद्याप कोणताच धोका नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात असा रुग्ण सापडल्यास तो पुण्यातून आरोग्याच्या कारणांनी जिल्ह्यात आलेला असू शकतो. हा आजार संसर्गजन्य नसल्याने भीती न बाळगता आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. विविध रोग जंतूनपासून आपला बचाव करणारी रोग प्रतिकारक शक्ती जेव्हा आपल्याच शरीरावर हल्ला करते, तेव्हा काय होऊ शकते, हे या गिलान बार सिंड्रोम मध्ये लक्षात येते.
हा एक दुर्मिळ आजार आहे कारण लाखांमध्ये एखाद्या वेळेसच हा आजार होतो. मात्र हा आजार फार गंभीर स्वरूपाचा आजार आहे. रुग्णाची श्वसन करण्याची क्षमता बाधित झाली तर त्या रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता पडू शकते. या आजारात शरीरातील कमकुवत झालेले स्नायू पुन्हा मजबूत होण्यासाठी काही महिने सुद्धा लागू शकतात. दूषित पाण्यामुळे, प्रदूषणामुळे वाढलेल्या या आजाराचा सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्याला धोका नसल्याचे आरोग्य विभागा मार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.