
भाजावळीच्या आगीत घर, गोठा जळून खाक; कोतापूर येथील घटनेत दोन रेडे, एक बैल मृत्यूमुखी
राजापूर : शेतीत भाजावळीसाठी आग लावली आणि शेतकरी तेथून निघून गेला. आगीकडे दुर्लक्ष केले आणि आग फोफावत गेल्याने या आगीत घर व गोठा जळून खाक झाला. तालुक्यातील कोतापूर येथील गोंड्याची निवई येथे बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. या आगीत इमारतीचे नुकसान झाले असून दोन रेडे व एक पाडा मृत्यूमुखी पडला आहे. येथील शेतकरी तुकाराम गोवळकर यांचे सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सामाजिक बांधलिकी समजून शेतकरी असलेल्या तुकाराम गोवळकर यांना मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
तुकाराम गोवळकर हे आपल्या शेतातील भाजावळ करून घराकडे गेले होते. मात्र संध्याकाळी घर व गोठा एकत्रित असलेल्या इमारतीला अचानक आग लागली. परिसरातील ग्रामस्थ देखील आग आटोक्यात आणण्यासाठी धावून आले. मात्र त्यांना यश आले नाही. यावेळी रेड्यांना बांधलेले दावे सोडले मात्र धुराच्या लोटामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. यातून एक पाडा सुखरूप बाहेर पडल्यामुळे तो वाचला. या आगीमध्ये दोन रेडे व आणखी एक पाडा (छोटा बैल) मृत्यूमुखी पडले. तसेच शेतातील गोठा व घर यांचे नुकसान झाले. जीवनावश्यक वस्तूचा साठा, भांडी, मुलांची पुस्तके यांचे नुकसान झाले.
या प्रकरणाचा पंचनामा करण्यात आला असून सुमारे सव्वा दोन लाख रूपये नुकसान झाले, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान याची माहिती मिळताच येथील पंचायत समिती सदस्य व माजी सभापती अभिजित तेली यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. यावेळी सरपंच वंदना चव्हाण, उपसरपंच प्रमोद जाधव, बादल चौगुले, संदीप जानस्कर, किशोर जानस्कर यांनीही घटनास्थळी भेट दिली.