
शाॅर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत बंद असलेले घर जळून खाक.
शाॅर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत बंद असलेले घर जळून खाक झाल्याची घटना लांजा तालुक्यातील पालू येथील चिंचुर्टी-धावडेवाडी येथे बुधवारी रात्री घडली. या घरातील कुटुंब कामानिमित्त मुंबईला राहत असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, आगीत घर जळाल्याने माेठे नुकसान झाले आहे.तालुक्यातील पूर्व भागात दुर्गम भागात असलेल्या पालू चिंचुर्टी धावडेवाडी येथे प्रकाश रघुनाथ धावडे यांचे कौलारू घर आहे. धावडे यांचे सर्व कुटुंब नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत राहते. त्यामुळे हे घर बंद असते. बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान अचानक घराला आग लागली.
घरातून आगीचा धूर व ज्वाला दिसताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेत आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, रौद्र रूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही क्षणांत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामध्ये घरातील भांडीकुंडी, कपडे, अन्य साहित्य जळून खाक झाले.