कर्नाटकातील हायस्पीड नौका ताब्यात, आरवली येथे सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई
कर्नाटक किनारपट्टीवरील हायस्पीड नौकांच्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील घुसखोरी व मासळी लुटीबाबत आमदार नीलेश राणे यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली, तर मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर मत्स्य विभागाची धडक कारवाई अधिकच गतिमानपणे सुरू झाली.
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई करत कर्नाटक येथील हायस्पीड नौका ताब्यात घेतली आहे.आरवली वेंगुर्ला समोर १६ वाव समुद्री क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी मुरारी भालेकर सहायक मत्स्य विकास अधिकारी परवाना अधिकारी वेंगुर्ला यांनी २८ जानेवारी रोजी नियमित गस्त घालत होते. त्यावेळी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली जलशिला सुवर्णा कोटियान (रा. कोदावूर ता. मलपे, राज्य कर्नाटक) यांची नौका हनुमा सानिध्य नों. क्र.- IND – KA- २-MM-५२१७ द्वारे महाराष्ट्रातील जलधीक्षेत्रात आरवली वेंगुर्ला समोर अनधिकृतरित्या मासेमारी करत असताना, दिसून आली. त्या नौकेला मत्स्य विभागाने ताब्यात घेतले. नौकेवर नौका तांडेलसह इतर खलाशी होते.