“नवनिर्माण”च्या ऑटो एक्स्पोला उदंड प्रतिसाद

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स (सीएस) आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) विभागाच्या वतीने आज (२९ जानेवारी) राज्यस्तरीय क्विझ आयटी टेक फेस्ट आणि ऑटो एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हे या फेस्टचे १५ वे वर्ष आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑटोमोबाईल क्षेत्रात ४० वर्ष कार्यरत असलेले रत्नागिरीतील नाईक मोटर्सचे सर्वेसर्वा नजीर नाईक उपस्थित होते.

नवनिर्माण शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या या आयटी फेस्ट आणि अनोख्या ऑटो एक्स्पोचे त्यांनी कौतुक केले. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये झालेल्या बदलांचा मागोवा घेतानाच गाड्यांमध्ये आलेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी दिली. तसेच नवीन तंत्रज्ञान अवगत करणे का गरजेचे आहे याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर नजीर नाईक यांच्यासह नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, उपाध्यक्ष डॉ. अलिमिया परकार, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, सीएस-आयटी विभागाच्या प्रमुख प्रा. प्रतीक्षा सुपल उपस्थित होत्या.

चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी हा ऑटो एक्स्पो आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट करतानाच वेगळा विचार करण्याची क्षमता प्रत्येकाकडे असते, फक्त त्याला चालना देण्याची गरज असल्याचे नमूद केले. आजपर्यंत अशा एक्स्पोच्या माध्यमातून सुमारे पाच हजार विद्यार्थी बाहेर पडले आहेत. त्याचा चांगला परिणाम दिसून आल्याचे ते म्हणाले. यानंतर श्री. नाईक यांच्या हस्ते ऑटो एक्सपोचे उद्घाटन करण्यात आले. या एक्सपोमध्ये २०० सीसी ते १४०० सीसी क्षमता असलेल्या ३ लाखांपासून ते २२ लाखांपर्यंतच्या सुमारे ७० दुचाकी सहभागी झाल्या होत्या. तसेच चारचाकींमध्ये विंटेज ते सुपर मॉडेल्स अशा सुमारे १५ गाड्या सहभागी झाल्या होत्या. रत्नागिरीबरोबरच चिपळूण, राजापूर, संगमेश्वर येथून या गाड्या आल्या होत्या. डुकाटी कंपनीच्या महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या दोन मॉडेल्स एक मॉडेल या एक्स्पोमध्ये सहभागी झाले होते. हा एक्स्पो पाहण्यासाठी रत्नागिरी शहरातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती.

मनोगत व्यक्त करताना रत्नागिरीतील नाईक मोटर्सचे सर्वेसर्वा नजीर नाईक. ऑटो एक्स्पोचे उद्घाटन प्रमुख पाहुणे नजीर नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.दुचाकींची मॉडेल्स पाहताना मान्यवर. ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी झालेली सुपर मॉडेल कार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button