
कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्याकडून पहिल्या सत्रात हापूस आंब्याच्या 24 पेट्या एपीएमसी फळ बाजारात दाखल
नवी मुंबईतील वाशी येथे असणाऱ्या एपीएमसी फळ बाजारात यंदाच्या हंगामातील पहिली हापूस आंब्याची पेटी दाखल झाली आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्याकडून पहिल्या सत्रात हापूस आंब्याच्या 24 पेट्या इथं दाखल झाल्या असून एपीएमसी बाजारात या हापूस आंब्याची विधिवत पूजाही करण्यात आली. आंब्याच्या एका पेटीत 4 ते 6 डझन आंबे असून या एका पेटीला 10 ते 15 हजार इतका भाव मिळत आहे.
यंदा आंब्याचा हंगाम काहीसा लांबला असला तरी मार्च पर्यंत आंब्याची चांगली आवक होईल असा विश्वास आंबा व्यापारी व्यक्त करत आहेत. आंब्याच्या पेटीसाठीची ही गडगंज रक्कम पाहता, या किमतीत एखाद्या चांगल्या कंपनीचा बेस मॉडेल स्मार्टफोन सहज खरेदी करता येईल असंच अनेकांना वाटेल. येत्या काळात आंब्याच्या या दरांमध्ये चढ उतार पाहायला मिळतील हे स्पष्ट असलं तरीही सध्याचे हे दर अनेकांनाच आश्चर्याचा धक्का देत आहेत हे मात्र नाकारता येत नाही.
यंदा हापूरआधी कोकणातील केशर आंब्याची पेटी वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई मार्केटमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्यामुळं बाजारपेठांमध्येही हापूसआधी केशरच हजेरी लावणार हे चित्र स्पष्ट झालं होतं. देवगड तालुक्यातील शेतकरी शकील मुल्ला यांच्या आंबा बागेतील ही केशर आंब्याची पेटी असल्याचं सांगण्यात आलं असून, एका पेटीमध्ये पाच डझन आंबे होते.