
ज्येष्ठांनी भूतकाळ, भविष्यातील चिंता विसरून वर्तमानात निरामय जीवनाचा मंत्र स्वीकारावा.
कुवारबाव ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात चिंतन चर्चा**रत्नागिरी प्रतिनिधी* : ज्येष्ठ नागरिकांनी भूतकाळात घडलेल्या घटना विसरून भविष्याची चिंता न करता वर्तमानात आनंदी सुखमय आणि निरामय जीवन जगण्याचा मंत्र आचरणात आणावा, असे मौलिक विचार कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक मासिक स्नेह मेळाव्यातील चिंतन या चर्चासत्रात ज्येष्ठांनी व्यक्त केले.संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्यात नूतन सभासद गणपत खामकर, पांडुरंग दुडीये तसेच नारायण नानिवडेकर, दिलीपराव साळवी, अशोक शिवलकर आदीनी ज्येष्ठानी उतारवयात प्राणायाम, योगासने, फिरणे याबरोबरच आपले आवडते छंद जोपासले तर व्याधीमुक्त जीवन जगता येते, हे स्वानुभवातून कथन केले. श्री. प्रकाशराव साळवी यांनी पडवेवाडी, झोरे कंपाउंड, स्वामी स्वरूपानंद पतपेढी नजीक सुरू झालेल्या शासकीय आरोग्यवर्धिनी दवाखान्यात बाह्य उपचार, लसीकरण आदी मोफत आरोग्य सुविधांचा लाभ कुवारबाव पंचक्रोशीतील जनतेने घेण्याचे यावेळी आवाहन केले.संघाच्या सभासद सौ.आरती पवार यांनी संघाच्या संतश्रेष्ठ गाडगेबाबा वाचन कक्षासाठी रॅक दिला असून त्यामध्ये वाचनासाठी प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रभाकर कासेकर यांनी साप्ताहिके, दिवाळी अंक, मासिके आदी नियतकालिके उपलब्ध करून दिल्याबद्दल अध्यक्ष श्री. अंबरे यांनी त्यांना धन्यवाद दिले. संघाचा सप्टेंबर महाचा स्नेह मेळावा मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी घेण्यात येईल आणि यावेळी सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात येईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले. प्रारंभी श्री. शामसुंदर सावंत देसाई यांनी उपस्थिताचे स्वागत केले तर शेवटी डॉक्टर मनोहर चांडगे यांनी आभार मानले. पसायदानाने मेळाव्याचा समारोप करण्यात आला.