
‘डॉ. आंबेडकरांच्या संविधानानुसार हिंदू राष्ट्र सुरू, इस्लाम राष्ट्र बनविण्याचे मनसुबे खपवून घेणार नाही’; नीतेश राणेंचा स्पष्ट इशारा!
ओरोस : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार हिंदू राष्ट्र सुरू आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यात कोणी शेरीया कायदा लागू करत असेल तर खपवून घेणार नाही, असे भोंग्याबाबत काही निर्देश पोलिस खात्याला दिले आहेत. आमचे हिंदुत्ववादी सरकार न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची १०० टक्के अंमलबाजवणी करेल. कोणी कायदा भंग करीत असल्यास कठोर शिक्षा करेल, अशी माहिती राज्याचे मत्स्य व बंदर विकास तथा पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.
पालकमंत्री राणे यांनी जिल्हाधिकारी बैठक सभागृहात पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी पालकमंत्री म्हणाले, ”यापुढे कोणाचीही दादागिरी चालणार नाही. इस्लाम राष्ट्र बनविण्याचे मनसुबे खपवून घेतले जाणार नाहीत. पाच वेळा भोंगे वाजवणाऱ्यांनी स्वतः भोंगे बंद करावेत. जसा हिंदू समाज न्यायालयाच्या नियमांचे पालन करतो, सण साजरे करतो, तशीच अन्य धर्माच्या लोकांकडून अपेक्षा आहे.
सकाळी ५ वाजता भोंगे वाजताना दिसले, तर कडक कारवाई करण्यात येईल. न्यायालयाचे पुन्हा एकदा आभार मानतो. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार आपला देश काम करतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.” ते पुढे म्हणाले, ”मालेगावप्रकरणी नायब तहसीलदारांना निलंबित केल्याप्रकरणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. त्यांनी कृतीतून हिंदुत्व दाखविले आहे.”
उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. यावर बोलताना मंत्री राणे म्हणाले, ”स्वबळावर लढण्यासाठी लायकी लागते. प्रत्येकाने पायरी ओळखून राहायचे, हा नियम उद्धव ठाकरेंना तंतोतंत लागू होतो. त्यांची स्वबळावर लढण्याची कुवत नाही.”