
गणपतीपुळे येथून परतताना भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात कार शंभर फूट कोसळली, एकाचा मृत्यू ,आठ जण जखमी.
पुण्यातील भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या घाटात शंभर फूट खोल दरीत कार कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात शुभम शिर्के (22) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.तर यामध्ये अन्य 8 जण जखमी झाले आहेत.आज पहाटे 4:00 वाजताच्या सुमारास उंबर्डे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला.
महाड होऊन भोरच्या दिशेने भरधाव वेगात येणारी कार अनियंत्रित होऊन 100 फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये शुभम शिर्के या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत. या अपघातात अभिषेक रेळेकर हा तरुण देखील जखमी झाला आहे. अभिषेकने या अपघाताविषयी माहिती देताना,” आम्ही सर्वजण गणपतीपुळे इथे देवदर्शनाला गेलो होतो. देवदर्शन घेऊन आम्ही मित्राकडे जेवणासाठी थांबलो होतो, तिथे जेवण करून आम्ही पुण्याकडे यायला निघालो. त्यावेळी बराच उशीर झाला होता. त्यामुळे आम्ही ड्रॉयव्हरला म्हणालो आता उशीर झालाय आजचा दिवस थांबूया आपण पण त्यांना दुसऱ्या दिवशीचे भाडे असल्याने त्यांनी थांबण्यास नकार दिला. ” असे त्याने सांगितले.
त्यानंतर आम्ही उशिराच पुण्याकडे यायला निघालो. साधारण पहाटेच्या सुमारास अचानक गाडी दरीत कोसळली. त्यावेळी आम्ही सगळेजण गाढ झोपेत होतो. नेमका अपघात कशामुळे झाला हे आम्हाला कोणालाच कळले नाही. गाडीत असणारे आम्ही सर्वजण जखमी झालो होतो. पुढे जाऊन आम्ही ड्रायव्हरला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांची कोणतीच हालचाल होत नव्हती. अंधार असल्याने त्यांना आम्हाला वरती आणता देखील आले नाही. पण आम्ही अंधारात वाट काढत वर आलो,” असे त्याने सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीमचा सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. अपघातात शुभम शिर्के (22) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर मंगेश गुजर (26), आशिष गायकवाड (29), सिद्धार्थ गंधणे (26), सौरभ महादे (22), गणेश लवंडे (27), अमोल रेकीणर (27), यशराज चंद्र (22) आणि आकाश आडकर (25) हे गंभीर जखमी झाले आहेत.