
शिक्षणमंत्री ना.दादा भुसे यांचेसह पालकमंत्री ना.श्री उदय सामंत यांच्या आश्वासक ग्वाहीने अखेर रत्नागिरीकरांचे तीव्र उपोषण स्थगित
रत्नागिरी येथील श्री पतित पावन मंदिर भक्ती भूषण दानशूर श्रीमान भागोजी शेट कीर यांनी स्वखर्चाने बांधले असतानाही महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाने इयत्ता आठवीच्या इंग्रजी व मराठी पाठ्यपुस्तकात हे मंदिर वि दा सावरकर यांनी बांधल्याचा खोटा इतिहास प्रसिद्ध करून श्रीमान भागोजीशेठ कीर यांची अस्मिता संपविण्याचा खोडसाळ प्रयत्न केला आहे याप्रकरणी प्रजासत्ताक दिनी रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष श्री राजीव कीर यांच्या नेतृत्वाखाली सर्व अठरापगड समाजाच्या प्रतिनिधीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून पाठ्यपुस्तक मंडळाचा निषेध केला आणि हा खोटा इतिहास तात्काळ काढून टाकून खरा इतिहास स्पष्ट करण्याची मागणी केली.
या आंदोलनाची राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांनी गंभीर दखल घेऊन उपोषण स्थळी भेट दिली आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांची दूरध्वनी वरून उपोषणकर्त्यांशी चर्चा घडवून आणली त्यानंतर नामदार भुसे यांच्या अनुकूल प्रतिसादा नंतर आणि नामदार उदय सामंत आणि आपण स्वतः या विषयात लक्ष घालून खोटा इतिहास काढून टाकून खरा इतिहास पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे त्यांच्या आवाहन अनुसार हे उपोषण स्थगित केल्याचे जाहीर करण्यात आले.
या उपोषण प्रसंगी माजी आमदार श्री राजन साळवी, चंद्रहास विलणकर,अंकुर कीर, अरुणा शिरधनकर, निवृत्त तहसीलदार राजेंद्र बीरजे, कॅप्टन दिलीप भाटकर , सौ प्रज्ञा तिवरेकर, आर के विलणकर, अमृता मायनाक, सौ दया चवंडे, सौ ज्योती तोडणकर, सौ स्वाती मयेकर, कौस्तुभ नागवेकर, परिस पाटील, सिद्धेश सुर्वे, बाबू धामणस्कर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री प्रवीण जोशी, जिल्हा कार्यवाह गजानन करमरकर यांचे सह रत्नागिरी जिल्हा परीट समाजाचे श्री प्रभाकर कासेकर , तेली समाजाचे जिल्हा अध्यक्ष रघुवीर शेलार, कटबु समाजाचे अध्यक्ष बी टी मोरे, नाट्यसमीक्षक सरपडवळ, सुरेश शेट्ये, अण्णा लिमये, नितीन तळेकर, बंधू मायनाक, बंटी कीर, बाबा नागवेकर, सुरेंद्र घुडे,प्रविण रुमडे, उदय हातीसकर, सदा मयेकर, जितेंद्र शिरसेकर,निलेश बीरजे, दीपक तोडणकर, मुकुंद विलणकर आदी उपस्थित होते.
त्यांनीही आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. पतितपावन मंदिर विषयी खोटा इतिहास प्रसिद्ध करणाऱ्या पाठ्यपुस्तक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. परीट समाज संघाचे जेष्ठ सल्लागार श्री प्रभाकर कासेकर यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा मार्फत श्रीमान भागोजीशेठ कीर आणि त्यांचे गुरू संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांचे चरित्रग्रंथ प्रकाशित करण्याची ग्वाही मराठीभाषा मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. जयस्तंभ येथील हुतात्मा अनंत कान्हेरे उद्यानात गाडगेबाबा यांचे स्मारक करण्यासाठी निधीची उपलब्धता केली असून तेही स्मारक लवकरात लवकर पूर्ण केले जाईल असे सांगितले.