
*पीएम किसान योजनेचा १६ वा हफ्ता मिळण्यासाठी ई-केवायसी व आधार सीडिंग करा**१२ ते २१ फेब्रुवारी गावपातळीवर विशेष मोहीम*
*रत्नागिरी, – पीएम किसान योजनेचा १६ वा हफ्ता मिळण्यासाठी ई-केवायसी व आधार सीडिंग करून घ्या, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे. माहे फेब्रुवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा प्रस्तावित सोळावा हप्ता वितरित करण्याचे शासनाचे नियोजन असून, केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत संपृक्तता साध्य करण्यासाठी १२ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत गावपातळीवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. या योजनेमध्ये जिल्ह्यातील एकूण १ लाख ६५ हजार ४८ लाभार्थी सहभागी असून, यामधील ई-केवायसी प्रलंबित असलेले ३ हजार ५५१, बँक खाते आधार संलग्न नसलेले १५ हजार ४१८ लाभार्थी प्रलंबित आहेत. आधार सीडींगसाठी पोस्ट खाते, सामायिक सुविधा केंद्र व बँक व्यवस्थापनाच्या मदतीने तर, ई-केवायसी करिता जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये नियुक्त केलेले ग्रामस्तरीय व्हिलेज नोडल अधिकारी (VNO) व सामायिक सुविधा केंद्र (CSCs) यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. ई केवायसी आणि आधारसीडिंग प्रलंबित असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी संबंधित तालुका कृषी अधिकारी तसेच आपले गावासाठी नियुक्त असलेले कृषी सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध आहे. तरी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या आणि ई-केवायसी व आधार सीडिंग प्रलंबित असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी या संपृक्तता मोहिमेदरम्यान २१ फेब्रुवारीपर्यंत आपली प्रलंबित असलेली ई-केवायसी आणि आधारसीडिंग ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNO) व सामायिक सुविधा केंद्र (CSCs) यांच्याशी संपर्क साधून पूर्ण करावी. जेणेकरून शासनाकडून प्रस्तावित देय असणारा सोळाव्या हत्याचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळेल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. पांगरे यांनी केले आहे.www.konkantoday.com