
जिल्ह्यातील १०१ आरोग्य उपकेंद्रे भाड्याच्या जागेत
ग्रामीण भागात गरीब आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उपकेंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या उपकेंद्रांना स्वतःची जागा नसल्याने भाड्याच्या जागेतून रूग्णसेवा करावी लागत आहे. जिल्ह्यातील १०१ आरोग्य उपकेंद्रे सध्या भाड्याच्या जागेत असून, या उपकेंद्रांसाठी जागेचा शोध सुरू आहे.ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रे ही गरजू व गरीब रूग्णांच्या आरोग्यासाठी जीवनदायी ठरत आहेत. या उपकेंद्रांमध्ये किरकोळ उपचार करण्यात येत असले तरी रूग्णांना गरजेच्या वेळी त्यांचा उपयोग होतो. मात्र अनेक वर्षापासून हंगामी सेवा बजावणार्या या उपकेंद्राच्या इमारतीसाठी कोणीही दानशूर जमीन देण्यास पुढे येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३७८ आरोग्य उपकेंद्रे मंजूर आहेत. २१८ उपकेंद्रांच्या हक्कांच्या इमारती आहेत, तर १०१ इमारतींसाठी अजूनही जमीन मिळालेली नाही. या उपकेंद्रांच्या इमारत बांधण्यासाठी लागणारी जमीन खरेदी करण्यासाठी शासनाकडून कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे जमीन खरेदी करणार कशी, असा प्रश्न निरूत्तर राहिला आहे.त्यासाठी जमीन विनामोबदला मिळाली आणि जागेचे बक्षीसपत्र केल्यानंतरच त्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र उभारता येणार आहे. जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या उपकेंद्रांना कोणीही जमीन देण्यास पुढे येत नाही. त्यामुळे अजूनही या उपकेंद्रासाठी कोणी जागा देता का, अशी म्हणायची वेळ आली आहे.
५ गुंठे जमीन उपकेंद्रासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडून मिळणे आवश्यक आहे. ज्या जमिनी बक्षीसपत्राने देण्यात आल्या आहेत, दानशूर व ग्रामपंचायतींनी १७ उपकेंद्रांना इमारती बांधकामाची शासन स्तरावर प्रक्रिया सुरू आहे.शासन आदेशानुसार जमीन उपलब्ध होत नसल्यास ते उपकेंद्र जवळच्या गावात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात हलविण्यात यावे, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या होत्या.www.konkantoday.com