आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाईसाठी पाठपुरावा करणार- आ. निलेश राणे.
कुंभार्ली घाटातील गुरे तस्करी प्रकरणातील आरोपींवर जामीनपात्र कलमे लागली आहेत. या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असली तरी गुरे वाहतूक संघटीत गुन्हेगारी असल्याने या आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई व्हायला पाहिजे व या आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी, अशी आपली मागणी असून यासंदर्भात पोलिस प्रशासनाशी चर्चा केली आहे.तर येत्या अधिवेशनात गोवंश तस्करीप्रकरणी अजामीनपात्र कडक कायदा होण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी चिपळूण येथे गर्जना सभेत दिली.
हिंदु टिकला तरच देश टिकेल असे सांगतानाच आता जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.गोमातेच्या रक्षणार्थ गर्जना सभा चिपळूणमध्ये होत असली तरी आता पुढील सभा ही कराड येथे घेतली जाईल व गुरे तस्करी व गोमांस विक्रीचे पूर्ण रॅकेटच उद्ध्वस्त करून टाकू, असा इशारा आ. राणे यांनी यावेळी दिला. आपण संघटीतपणे आणि आक्रमकपणे याला विरोध करून गोमातेचे रक्षण केले पाहिजे, असे आ. राणे यांनी यावेळी म्हणाले.यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘गोहत्या को बंद करेंगे, ये हमारा संकल्प है!’ ‘गो माता की जय’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडण्यात आले होते. कुंभार्ली घाटात काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकारी विनोद भुरण व कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे गुरे तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या विषयात कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे आ. निलेश राणे यांनी तात्काळ लक्ष घालत चिपळूणमध्ये गोमातेच्या रक्षणार्थ गर्जना सभेची घोषणा केली होती.