आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या युती म्हणूनच एकत्र लढवल्या जातील- योगेश कदम.
शिवसेनेचे युवानेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोली मतदारसंघातील एका कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या युती म्हणूनच एकत्र लढवल्या जातील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.योगेश कदम म्हणाले, १०० टक्के युतीचे पालन केले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण एकत्रच लढू. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही युतीचे पालन करून लढवल्या जातील; पण तिथे देखील सगळे तोलूनमापून होणारच आहे.
कोणी काम केले आणि कोणी नाही केले, या सगळ्याचा अहवाल आपल्या पक्षामार्फत वरिष्ठांपर्यंत पोहोचलेला आहे.ज्यांनी विधानसभेला महायुतीच्या विरोधात काम केले त्यांचा अहवाल भाजपच्या व महायुतीच्या नेत्यांकडे गेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
मला या ठिकाणी आवर्जून सांगावे लागेल की, या विधानसभा निवडणुकीत माझ्या मतदारसंघात मिळालेले मोठे मताधिक्य व महाराष्ट्रातही महायुतीला मिळालेले मोठे यश या सगळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या निवडणुकीत सगळ्यांनी महत्त्वाची व चांगली भूमिका बजावली आहे.