
आगामी निवडणुकीत मुंबईतील जनता ठाकरेंना मूठमाती देईल-आशीष शेलार.
ज्यांनी कुटुंबासोबत दगा केला, ज्यांनी मित्रपक्षासोबत दगा दिला, ते उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीसोबतच दगा करतील, असे भाकीत सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री आशीष शेलार यांनी केले आहे.ठाकरेंच्या सोबत असणारे आमदार, खासदार, नगरसेवक व अनेक पदाधिकारी त्यांना सोडून जात आहेत. त्यांच्या सोबत कोणीच नाही, असेही श्री. शेलार म्हणाले. सिंधुदुर्ग दौऱ्यावर नांदोस येथील निवासस्थानी आलेल्या मंत्री आशीष शेलार यांनी नांदोस कट्टा येथे पत्रकार परिषद घेतली.
शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे ताकद, ऐपत यांपेक्षा जास्त वल्गना करत आहेत. सोबत असलेले सगळे सोडून जात असताना त्यांनी त्याचा विचार करावा. आमच्या नेत्यांवर टीका करण्याचा प्रयत्नही करू नये. ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत जनतेने नाकारले. आगामी निवडणुकीत मुंबईतील जनता त्यांना मूठमाती देईल. दोन अंकी संख्या जरी यांच्या नगरसेवकांची येणार नाही, अशी स्थिती जनताच निर्माण करेल, असेही श्री. शेलार यांनी सांगितले.