शिवसेनेचे माजी उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख व विद्यमान सहसंपर्कप्रमुख सचिन कदम यांचा आपल्या पदासह शिवसेना उबाठाच्या सदस्यत्वपदाचा राजीनामा.
शिवसेनेचे माजी उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख व विद्यमान सहसंपर्कप्रमुख सचिन कदम यांनी आपल्या पदासह शिवसेना उबाठाच्या सदस्यत्वपदाचा देखील राजीनामा दिला आहे. तब्बल 40 वर्षे शिवसेनेच्या विविध पदावर सक्रिय असणार्या एका जुन्या शिवसैनिकाने राजीनामा दिल्याने उत्तर रत्नागिरीतील शिवसेना गोटात खळबळ उडाली आहे. त्यांना शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांचे खंदे समर्थक मानले जाते.याबाबत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आपले राजीनामा पत्र सादर केले आहे.
यामध्ये आपण व्यक्तिगत कारणासाठी हा राजीनामा देत असून आपण पक्षाच्या कामासाठी वेळ देऊ शकत नसल्याने सहसंपर्कप्रमुख व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. अवघ्या चार ते पाच ओळींचे पत्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. यामध्ये, आपण चाळीस वर्षे शिवसेनेमध्ये सक्रिय असल्याचे आवर्जुन नमूद केले आहे. त्यांनी चिपळूण शहरामध्ये नगरसेवक पद भूषविले असून शहरातील संघटनेत महत्त्वपूर्ण काम केले.