गुहागर शहरातून बेपत्ता झालेली मुले चिपळुणात सापडली

गुहागर : शहरातील दोन मुले शाळा सुटल्यानंतर घरी परत आली नाहीत. रात्री उशिरापर्यंत मुलांचा ठावठिकाणा न लागल्याने पालकांनी ही बाब गुहागर शहरातील कुलस्वामिनी चौकातील काही मंडळींना सांगितली. शोध सुरु झाला. अखेर ही मुले चिपळूण तालुक्यात सापडली. शुक्रवारी 8 जुलैला रात्री 11.15 च्या दरम्यान चिपळूण पोलिसांकडून या मुलांना पालकांनी ताब्यात घेतले . या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात नाही.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन शाळकरी मुले शुक्रवारी 8 जुलैला शाळा सुटल्यानंतर घरी परत आली नाहीत. पालक आणि नागरिकांनी शोध घेतला. शोधाशोध सुरु असताना ही मुले रानवी, पवारसाखरीमार्गे शृंगारतळीपर्यंत आल्याचे दोन दुकानांबाहेरील सीसीटीव्ही फुटेजवरुन कळले होते. या मुलांना शृंगारतळीत एक ओळखीची मोटरसायकल दिसली. सोबत आणलेली सायकल शृंगारतळीत ठेवून ही मुले मोटरसायकलने चिपळूणला गेली. दरम्यान आपली मोटरसायकल चोरीला गेल्याची माहिती शृंगारतळीतील पोलीसांना दिली. गुहागर पोलीसांनी वायरलेसद्वारे मोटरसायकल चोरीची माहिती जिल्ह्यात दिली. या संदेशामुळे चिपळूणचे पोलीस सतर्क होते. कापसाळ, ता. चिपळूण येथे दोन शाळकरी मुले मोटरसायकलवरुन जात असल्याचे पाहून गस्तीवरील पोलिसांना संशय आला. या मुलांना थांबवून चौकशी केल्यावर सारा प्रकार उघड झाला. पोलिसांद्वारे मोटरसायकल आणि मुले सापडल्याचा निरोप गुहागरपर्यंत पोहोचला. याच दरम्यान गुहागर कुलस्वामिनी चौकातील तरुणांचा एक गट व एका मुलाचे पालक मुलांना शोधण्यासाठी चिपळूणपर्यंत पोचले होते. त्यांनी या मुलांना ताब्यात घेतले. मात्र मोटरसायकल चोरी आणि बेपत्ता मुलांबाबत पोलीसांकडे कोणतीच तक्रार नसल्याने या घटनेची नोंद झाली नाही. चिपळूण व गुहागर पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल पालकांनी आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button