राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्षिण रत्नागिरीचा भंडारी समाजाच्या उपोषणाला पाठिंबा!
इतिहासाच्या आठवीच्या पुस्तकातील धड्या मध्ये पूर्वी स्वा. वीर सावरकर यांच्या विनंतीवरून दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी रत्नागिरीत पतितपावन मंदीर बांधले असा पाठ होता तो बदलून रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर वि. दा. सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा मजकूर छापा छापण्यात आला आहे तो तात्काळ बदलण्यात यावा यासाठी भंडारी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रसार माध्यमांनी सर्व पुराव्यानिशी या बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे सर्व समाज स्तरावर पाठ्यपुस्तकातील धडा बदलण्याची मागणी जोर धरत आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दक्षिण रत्नागिरीचे जिल्हा कार्यवाह गजानन करमरकर , मिलिंद टगारे, कौस्तुभ सावंत यांनी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन समाज संघाच्या मागणीला एकमुखी पाठींबा जाहीर करून, शिक्षण विभाग व पाठ्यपुस्तक मंडळाला पत्रव्यवहार करण्यासाठी पतितपावन मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिलालेखाचा फोटो व भागोजी शेठ कीर यांच्या व्यवसायाच्या ऑडिट रिपोर्टची प्रत घेतली.
स्वा. वीर वि. दा. सावरकर यांच्या विनंतीवरून दानशूर शेठ श्रीमान भागोजी बाळाजी कीर यांनी स्वखर्चाने पतितपावन मंदिर बांधले हे त्रिवार सत्य आहे ते कोणालाही नाकारता येणार नाही. पाठ्यपुस्तकातील धडा बदलण्यासाठी दक्षिण रत्नागिरी मार्फत तात्काळ पत्रव्यवहार केला जाईल त्याचबरोबर प्रजासत्ताकदिनी उपोषणामध्ये सहभागी होण्याची ग्वाही श्री गजानन करमरकर व मिलिंद टगारे यांनी भंडारी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.