भंडारा आयुध निर्माणीत स्फोट; अनेक गावांना हादरे, मोठी जीवितहानी?
भंडारा : स्फोट आयुध निर्माणी भंडारा (जवाहर नगर) च्या एलपीटीई २३ नंबरच्या इमारतीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता दरम्यान जोरदार स्फोट झाला. त्यात मोठ्याप्रमाणात जीवित हानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र प्रशासनाने अद्याप याला दुजोरा दिला नाही.
जवाहर नगर परिसरातील जवळपासच्या डझनभर गावांना याचा फटका बसला आहे. या ठिकाणी आर डी एक्स चे निर्माण होते. सध्या कंपनीचे मुख्यद्वर सील करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी गेट जवळ एकच गर्दी केली असून रात्रपाळीत कंपनीत कामाला गेलेले कुटुंबातील नातलग सुखरूप आहेत की नाही याबाबत विचारणा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरवात केली आहे.२०२४ या वर्षी जानेवारी महिन्यात जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डीनेस फॅक्टरी) भीषण स्फोट झाला होता. त्यातएक कर्मचारी ठार झाला होता. कंपनीतील सी एक्स विभागात हा स्फोट झाला होता या घटनेपूर्वी भंडारा शहरालगत असलेल्या सनफ्लॅग कंपनीतली स्फोट झाल्याची घटना घडली होती. त्यामध्ये तीन कर्मचारी भाजले होते. यावर्षी घडलेली ही पहिली घटना आहे.
जिल्हा नियंत्रण कक्ष येथे प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी सकाळी अंदाजे दहा वाजता आयुध निर्माणी जवाहर नगर येथे एक स्फ़ोट झालेला असून त्यामध्ये काही काम करणारे कर्मचारी हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळावर अग्निशमन पथक पोलीस विभाग तहसीलदार व इतर आवश्यक प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत. सदरचे अनुषंगाने अधिकची मदत म्हणून एसडीआरएफ यांना पाचरण करण्यात आले आहे.