धर्मवीर आनंद दिघे एक्स्प्रेस ही अनारक्षित गाडी गणेशोत्सवाच्या आधी किमान तीन दिवस सोडावी,-कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे निवेदन

गणेशोत्सवात चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर ठाणे ते थिविम स्थानका दरम्यान धर्मवीर आनंद दिघे एक्स्प्रेस ही अनारक्षित गाडी गणेशोत्सवाच्या आधी किमान तीन दिवस सोडावी, अशी आग्रही मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.धर्मवीर चित्रपटाच्या माध्यमातून तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरुवर्य असलेल्या आनंद दिघे यांच्याप्रती सर्वत्र आदर व्यक्त होत असताना धर्मवीरांना आगळी वेगळी आदरांजली वाहण्याचा संकल्प कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाने सोडला आहे. या पार्श्वभूमीवर धर्मवीरांचे स्मारक म्हणून गणेशोत्सवात धर्मवीर एक्सप्रेस सोडण्यात यावी, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाचे राजु कांबळे यांनी व्यक्त केली.कोकणवासियांना गणेशोत्सव म्हणजे पर्वणी असते. मुंबई-ठाणे परिसरातील चाकरमानी गणेशोत्सव काळात हमखास कोकणातील गावी जातातच. पण नियमित गाड्यासह गणपती स्पेशल गाड्यांचेही आरक्षण काही मिनिटातच फुल्ल होत असल्यानेठाणे – मुंबई परिसरातील कोकणवासीयांचे ऐन गणेशोत्सवात अक्षरशः हाल होतात. तेव्हा, कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात (७ सप्टेंबर २०२४ पूर्वी) ठाणे ते थिवीम मार्गावर धर्मवीर आनंद दिघे एक्स्प्रेस (अनारक्षित) किमान तीन दिवस अगोदर (परतीच्या प्रवासासह) चालवण्यात यावी. जेणेकरून ठाणे शहरातील तसेच ठाणे लगतच्या प्रवाशांना या गाडीचा लाभ होऊन चाकरमानी गणेशभक्त सुरक्षित प्रवास करतील, असे कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने खासदार म्हस्के यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.वास्तविक मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानक हे महत्त्वाचे स्थानक असून धर्मवीर आनंद दिघे हे ठाणेकरांचे श्रद्धास्थान आहेत. किंबहुना, ठाणे स्थानकातून कोकणात मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असल्याने धर्मवीर आनंद दिघे यांच्यासारख्या थोर समाजसेवकाला आदरांजली वाहण्याकरिता एनडीए सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने या मागणीवर प्रकर्षाने विचार करावा, अशी मागणी चाकरमान्यांकडून जोर धरीत आहे. या अनुषंगाने गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button