सौ. रेखा रवींद्र इनामदार यांच्या निधनाने सेवाभावी संस्थांचा आधारवड हरपला
रत्नागिरी : रत्नागिरी येथील जागुष्टे माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. रवींद्र इनामदार यांच्या सुविद्य पत्नी सौ. रेखा रवींद्र इनामदार तथा पूर्वाश्रमीच्या सुगंधा रामचंद्र भावे यांचे दिनांक 20 जानेवारी रोजी असाध्य आजारामुळे वयाच्या 62 व्या वर्षी अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक सेवाभावी संस्थांचा आधारवड हरपला आहे. त्यांच्या पश्चात पती श्री. रवींद्र इनामदार, मुलगा डॉक्टर विवेक इनामदार, मुलगी सौ. कीर्ती आणि तीन नातवंडे असा परिवार आहे.स्वर्गीय रेखा इनामदार यांनी रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागात वरवडे येथील माध्यमिक विद्यालयात सुमारे 33 वर्षे माध्यमिक शिक्षिका म्हणून काम करताना विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून नावलौकिक संपादन केले. सन 2020 मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या. संस्कृत हा त्यांचा आवडीचा विषय असल्याने विद्यार्थ्यांना संस्कृतची गोडी लावून संस्कृत मधील वक्तृत्व, नाट्य स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी करून दिल्लीपर्यंत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कारांचा मान मिळवून दिला.स्वर्गीय इनामदार मॅडम रत्नागिरी जिल्हा संस्कृत अध्यापक मंडळाच्या अध्यक्ष होत्या. तसेच बीएड कॉलेज माजी विद्यार्थी मंडळाच्या ज्येष्ठ सदस्य होत्या.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन विविध क्षेत्रात समाज उपयोगी कार्यांचा ठसा उमटविला. कुवारबाव येथे स्वामी स्वरूपानंद ग्रंथालय सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्या या ग्रंथालयाच्या माजी सचिव होत्या. इनामदार कुटुंबीय वास्तव्यास असलेल्या गयाळ वाडी येथील स्वामी स्वरूपानंद वसाहतीत नळ पाणी योजनेसाठी लोक वर्गणी जमा करून पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. कुवारबाव ब्राह्मण समाज संघाच्या कार्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
विविध सेवाभावी संस्थांना त्यांनी उदारपणे देणग्या देऊन मोलाचा आर्थिक हातभार लावला होता.सौ. रेखा इनामदार यांनी सेवानिवृत्तीनंतर कन्याकुमारीपासून केरळ पर्यंत पर्यटनाचा आनंद घेतला. मात्र अकाली असाध्य आजाराने त्यांचा हा प्रवास अपूर्ण राहिला. त्यांचे आत्म्यास परमेश्वराने चिरशांती द्यावी ही प्रार्थना.