रायगड जिल्हा पालकमंत्री पदावरून गोगावले यांचे कार्यकर्ते आक्रमक.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी बंगल्याबाहेर शिवसेना मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत रस्ता बंद केला. पोलिसांनाही न जुमानता गोंधळ सुरू असल्याने सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी बंगल्याबाहेर निघून गेले. रायगड जिल्हा पालकमंत्री पदावरून गोगावले यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व आमदार, प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी बंगल्यावर येत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. दरम्यान, भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळावे, यासाठी शेकडोंच्या संख्येने अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मलबार हिल येथे मुक्तागिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठीआले होते. याच ठिकाणी पालकमंत्री पद मिळणे हा आमचा हक्क आहे.
चार टर्म भरतशेट गोगावले निवडून आलेले आहेत. आता पालकमंत्री पद मिळालेच पाहिजे.तसेच रायगड जिल्ह्यात तीन आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळाले पाहिजे, अन्यथा रायगड बंद करू, असा इशारा यावेळी गोगावले यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.