चिपळूण हायटेक बस स्थानक म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण ठरतय, संदीप सावंत यांचा आरोप.
गेले आठ महिने चिपळूण हायटेक बस स्थानकाचे बांधकाम रडत-रखडत सुरू आहे. निधीअभावी काम रखडल्याचा कांगावा एसटी महामंडळाकडून केला जात आहे. मात्र काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन ठेकेदारांना कामाच्या रक्कमेपोटी तब्बल पावणे दोन कोटींची बिले देवूनही इमारतीचे काम तीस टक्के सुद्धा पूर्णत्वास केलेले नाही. अधिकार्यांमार्फत केवळ या कामासाठी वाढीव रक्कमेची नवीन निविदा काढून नवा ठेकेदार नेमण्याचा पंचवार्षिक कार्यक्रम सुरू आहे.
यामुळे या बसस्थानकाचे काम भ्रष्टाचाराचे कुरणच बनल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष व अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी केला आहे. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. मुदतीत काम पूर्ण न करणार्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांची अनामत रक्कम जप्त करावी, अशी मागणीही केली आहे.www.konkantoday.com