
संजय राऊत यांच्यानंतर उदय सामंत यांच्याबाबत सुषमा अंधारे यांचे आणखी वक्तव्य.
महायुतीमध्ये पालकमंत्री पदांच्या वाटपावरुन प्रचंड असंतोष निर्माण झाला असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचे आमदार उदय सामंत कोणत्याही क्षणी भाजपचा हात पकडू शकतात.शिंदे गटातील 20 आमदार त्यांच्यासोबत फुटून बाहेर पडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी सोमवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भात भाष्य केले.इंग्रजीत एक म्हण आहे, ‘हिस्टरी रिपीटस् इटसेल्फ’. तुम्ही जे पेरता तेच उगवतं, तुम्हाला तेच परत मिळतं.
विजय वडेट्टीवारांनी नव्या समीकरणांच्या ‘उदया’बाबत केलेले वक्तव्य महत्त्वाचे आहे. या राज्यात महायुतीने ईव्हीएम आणि अन्य गोष्टींची मदत घेऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झाले तेव्हा उपमुख्यमंत्रीपद शिवसेनाला मिळणार, असे सांगण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही, अशी चर्चा होती. त्यावेळी पहिल्यांदा उदय सामंतयांना आपण उपमुख्यमंत्री होऊ असे वाटले. आपण उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार होऊ शकतो, या त्यांच्या महत्त्वाकांक्षेला तेव्हा धुमारे फुटले होते, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.एकनाथ शिंदे यांचे रुसवे-फुगवे अनेकदा दिसून येतात. भाजपला एकनाथ शिंदे यांचे हे दबावाचे राजकारण रुचलेले नाही. त्यामुळे भाजपला उदय सामंत यांच्यासारखा फ्लेक्सिबल चेहऱ्याची गरज आहे.
उदय सामंत आधी राष्ट्रवादी, शिवसेना आणि शेवटी शिंदे गट असा प्रवास करुन झालेले आहेत. त्यामुळे आता चांगली संधी आल्यास ते शिंदे गटाशी फारकत घेऊन चटकन भाजपमध्ये जाऊ शकतातभाजप निश्चितपणे नव्या समीकरणाचा ‘उदय’ घडवून आणू शकते. यादृष्टीने आताच्या घडामोडी विचार करायला लावणाऱ्या आहेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.