रायगड, रेवदंडा येथे डिझेल तस्करीचा पर्दाफाश!
अलिबागजवळच्या रेवदंडा येथील कुंडलिका खाडीत आज पहाटे सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम ) पथकाने मोठी कारवाई करत डिझेल तस्करीचा पर्दाफाश केला आहे. यात ५ टँकर आणि२ बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणात ५ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
अरबी समुद्र मार्गे रेवदंडा खाडीतून डिझेल तस्करी होत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार कस्टमच्या पथकाने तेथे पाळत ठेवली आणि या सर्व डिझेल तस्करीचा भांडाफोड केला. या ठिकाणी डिेझेल वाहून नेणारे ३२ हजार लीटर क्षमतेचे ४ आणि ५ हजार लीटर क्षमतेचा १ असे ५ टँकर जप्त केले. तसेच मासेमारी करणारया दोन बोटी ताब्यात घेतल्या आहेत. ‘कुलदैवत साईखंडोबा’ आणि जय धनलक्ष्मी नावाच्या या बोटींमधून मासेमारीच्या नावाखाली खुलेआम बेहि शोबी डिझेलची वाहतूक केली जात होती. त्यासाठी कुंडलिका खाडीकिनारी रेवदंडा येथील जेटीचा वापर केला जात होता.या कारवाईत ५ तस्करांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबई बंदरात नेण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या हजारो लिटर डिझेलची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
या यशस्वी मोहिमेमुळे समुद्रातील डिझेल तस्करी रोखण्यात सीमा शुल्क विभागाला यश आले आहे. या बोटी मुंबई बंदरात नेण्यात आल्याची माहिती असून आणखी एका बोटीचा शोध सुरू आहे. रेवदंडा पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस अवघ्या २०० मीटर अंतरावर रेवदंडा जेटी आहे. याच जेटीवरून खुलेआम डिझेल तस्करी होत होती.