
रत्नागिरीत उद्या २२ व २३ जानेवारीला कालिदास स्मृती व्याख्यानमाला सकाळी ११ वाजता गोगटे कॉलेजमध्ये आयोजन.
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे कालिदास स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन बुधवार (ता. २२) आणि २३ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. सचिन कठाळे व्याख्यान देणार आहेत.महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सकाळी ११ वाजता व्याख्याने सुरू होणार आहेत. २२ ला डॉ. कठाळे हे संस्कृतची सद्यस्थिती आणि २३ ला भारतीय ज्ञान परंपरा यावर व्याख्यान देणार आहेत. व्याख्यानमालेचे हे ६८ वे वर्ष आहे. डॉ. कठाळे हे एम. एस्सी (वनस्पतिशास्त्र), पी. एचडी (अथर्ववेदातील वनस्पतीविज्ञान), एमए (संस्कृत) आहेत.
संस्कृत भारतीचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. कोकण प्रांत संघटनमंत्री, विदर्भ प्रांत संघटनमंत्री, अखिल भारतीय कार्यालय प्रमुख (दिल्ली), अखिल भारतीय प्रचार प्रमुख अशी पदे त्यांनी भूषवली आहेत. संस्कृतमधील विज्ञान या प्रदर्शन व पुस्तकाच्या लेखक गटाचे सदस्य आणि कर्माचा सिद्धांत या पुस्तकाचा संस्कृत अनुवाद त्यांनी केला आहे. त्यांच्या व्याख्यानासाठी जास्तीत जास्त अभ्यासू, रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.