जि.प. मधील अनेक ठिकाणी आणि मुख्य गेटवर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही बंद,पशु संवर्धन विभागात असणारे दोन संगणक चोरीला.
रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील पशु संवर्धन विभागात असणारे दोन संगणक चोरीला गेले असून याबाबतची तक्रार जि.प. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. परंतु ते गेले अनेक दिवस बंद असून त्याकडे लक्ष दिले जात नाही. याचाच फायदा घेत जि.प. मधील अनेक मौल्यवान सामान लांबविले जात असल्याची चर्चा सुरू आहे.
त्यातच आता जि.प. पशु संवर्धन विभागात बसविलेले अत्याधुनिक चांगल्या प्रकारचे लाख रुपयांचे संगणक चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला १०० दिवसांचा कार्यक्रम राबविताना जि.प.मधील अनेक सामान व्यवस्थित लावले जात आहे. त्यासाठी बाहेरील व्यक्तींचा वावरही वाढला असून जि.प. मधील अनेक ठिकाणी आणि मुख्य गेटवर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही बंद ठेवण्याचे कारण काय ? संपूर्ण राज्यासह शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी शासन प्रयत्नशील असताना जि.प. मधील बंद असलेले सीसीटीव्ही चर्चेचा विषय झाला आहे.