मार्लेश्वरच्या विकासासाठी विशेष निधी हवा, आमदार शेखर निकम यांचा पाठपुरावा.
संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवस्थानच्या विकासासाठी आमदार शेखर निकम यांनी पर्यटनमंत्री ना. शंभुराज देसाई यांची भेट घेतली. या चर्चेत मार्लेश्वर परिसराच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्याची विनंती करण्यात आली. या निधीतून मंदिर परिसराचा विकास, धबधब्याच्या ठिकाणी संरक्षक सुविधा, निसर्ग पर्यटनासाठी विशेष जातींची उभारणी व पर्यटकांना प्रोत्साहन देणार्या योजना राबविण्यात येणार आहेत. उंच डोंगरावर बसलेले मार्लेश्वर हे शंकराचे जागृत देवस्थान आहे. सह्याद्री पर्वतरांगा, वर्षभर वाहणारे धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे भाविकांसाठी हे ठिकाण धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्या महत्वाचे ठरते.
दरवर्षी महाराष्ट्रभरातून हजारो पर्यटक, भाविक येत असतात. मार्लेश्वर परिसरात आवश्यक पर्यटन सुविधा, सुशोभिकरण, पार्किंग व्यवस्था, रस्ते विकास, स्वच्छतागृहे, वीज, पाणीपुरवठा अशा मुलभूत सुविधांचा अभाव आहे. या कारणांमुळे भाविक, पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागतो. आमदार निकम यांनी प्रादेशिक पर्यटनअंतर्गत १० कोटी रुपये निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे.www.konkantoday.com