पदयात्री आशुतोष जोशीबरोबर आज रत्नागिरीत संवाद कार्यक्रम

रत्नागिरी कोकणातील निसर्ग आणि पर्यावरणाच्या जतन-संवर्धनबाबत जनजागृती करण्यासाठी कोकण किनारपट्टीच्या भागातून पदयात्रा करत असलेल्या आशुतोष जोशी या तरुणाशी संवादाचा कार्यक्रम सोमवारी (२० जानेवारी) रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी रायगड जिल्ह्यातील रेवस येथून आशुतोषने या पदयात्रेचा प्रारंभ केला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी या बंदरावर सांगता होणार आहे. या पदयात्रेमागील त्याची भूमिका समजावून घेऊन अनौपचारिक संवाद साधता यावा, या हेतूने *सोमवारी संध्याकाळी ७ वाजता रत्नागिरीतील मराठा भवन हॉलमध्ये (बेसमेंट)* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गुहागर तालुक्यातील नरवण येथील रहिवासी असलेल्या आशुतोषने छायाचित्र कला या विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर इंग्लंडमधील ग्लॉस्टरशर विद्यापीठात व्हिज्युअल आर्ट या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यादरम्यान आणि त्यानंतर सुमारे साडेचार वर्षे त्याने इंग्लंडमध्ये या क्षेत्रात कामही केले. पण भारतातील आर्थिक-सामाजिक समस्या, तसेच कोकणच्या निसर्ग आणि पर्यावरणाचा होत असलेल्या ऱ्हासामुळे व्यथित होऊन आशुतोषने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.

येथे आल्यानंतर त्याने २०२२ मध्ये नरवण ते विशाखापट्टण अशी सुमारे १८०० किलोमीटर पदयात्रा केली. या पदयात्रेत महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ, तसेच आंध्र प्रदेशच्या काही भागातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रश्नांचा धांडोळा स्थानिक जनतेशी संवाद साधत आशुतोषने घेतला. त्याच धर्तीवर सध्या कोकणच्या किनारपट्टीवर येथील निसर्ग आणि पर्यावरण वाचवण्याची हाक देत त्याची ही पदयात्रा चालू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी येथे मार्च महिन्यात या पदयात्रेची सांगता होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button