
महिलांसाठी असलेल्या त्या शाळेतील आणखीन एका संशयित शिक्षकावर ॲट्रॉसिटी व पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरातील महिलांसाठी असलेल्या विद्यालयात विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार आठवडाभरापूर्वी समोर आलेला असतानाच शनिवारी आणखी एका शिक्षकाचे मुलीशी गैरवर्तन केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीसह पालकांनी शहर पोलीस ठाणेत तक्रार दाखल केली असून त्या संशयित शिक्षकाविरोधात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी या शाळेतील विद्यार्थिनीशी गैरप्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर सर्व स्तरातून संबंधित शिक्षकाविरोधात संताप व्यक्त होत होता.
संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी त्या शाळेत जाऊन या प्रकाराचा जाब विचारत शिक्षकाची धुलाई केली होती. त्यामुळे हा प्रकार उजेडात आला. शाळा व्यवस्थापनाने या प्रकाराची दखल घेत त्या शिक्षकाला तत्काळ निलंबितही केले होते. हे प्रकरण ताजे असतानाच याच शाळेतील विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शनिवारी आणखीन एका संशयित शिक्षकावर ॲट्रॉसिटी व पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे