
मराठी माणसाला भागोजी कीर माहित नाहीत हे आपलं दुर्दैव आहे.
आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करणारे किती उद्योजक माहिती असतात? कदाचित फारच थोडे. अगदी एखादं नाव घ्यायचंच झालं तर आपल्याला धीरूभाई अंबानींशिवाय दुसरं नाव पण आठवत नाही. पण महाराष्ट्रात असे अनेक लोक झालेत ज्यांनी कष्टांच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर आपलं नाव मोठं केलं.अशाच मराठी उद्योजकांपैकी एक म्हणजे उद्योगमहर्षी भागोजी किर. मुंबईत आजही भक्कमपणे उभ्या असलेल्या मरीन ड्राइव्हच्या भिंतीसकट मुंबईतील अनेक नावाजलेल्या इमारतींचे निर्माते असणारे भागोजी किर हे आज आपल्यापैकी बऱ्याच मराठी लोकांना माहिती नाहीत हे दुर्दैवच म्हणावे लागे.
पुढे जाऊन मॅनेजमेंट गुरु अशी ओळख निर्माण झालेल्या भागोजी किर यांचा जन्म १८ व्या शतकात कोकणात झाला. त्यांची आई लक्ष्मीबाई अत्यंत सात्विक वृत्तीची. वडील बाळू शेतमजूर म्हणून काम करायचे. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने खेळण्या-बागडण्याच्या वयातच त्यांच्या वाट्याला कष्ट आले. लहानपणी ते रानफुले, उंडणीच्या बिया अशा गोष्टी विकून घर चालवण्यास हातभार लावण्याचा प्रयत्न करायचे.लहान असताना भागोजी समुद्रकिनारी राहायचे.
रत्नदुर्गच्या किल्ल्याच्या जवळ त्यांचं लहानसं घर होतं. या किल्ल्याकडे पाहून त्यांना कायम आपलंही असंच साम्राज्य असावं असं वाटायचं.भविष्यात जर आपल्याला काही मोठं करायचं असेल आणि या गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर त्याला केवळ शिक्षण हाच पर्याय आहे हे भागोजींना कळून चुकलं होतं.शिक्षण घ्यायचं तर प्रश्न होता पैशांचा. तेव्हा मिशनरी शाळा असायच्या आणि त्याची भरमसाठ फी भागोजींच्या कुटुंबाला भरणे शक्यच नव्हते. पुढे कसं तरी त्यांनी प्रयत्न करून सरकारी शाळेत प्रवेश मिळवला. सरकारी शाळेत शिक्षण जरी मोफत असलं तरी शालेय साहित्याचा प्रश्न होताच. त्यावर देखील त्यांनी तोडगा काढला. त्यांनी सोनचाफ्याच्या फुलासोबत उंडलाच्या बिया रगडून त्याचे तेल काढून ते विकण्यास सुरुवात केली.शालेय शिक्षण घेत असताना लहानपणापासूनचं श्रीमंत होण्याचं स्वप्न भागोजींना स्वस्थ बसू देत नव्हतं.
गरिबीवर मात करण्यासाठी त्यांनी स्वप्ननगरी मुंबईत जाण्याचा निश्चय केला. इथे पुन्हा आर्थिक अडचण निर्माण झाली, मुंबईला जाण्याकरिता पैसे लागणार होते आणि ते भागोजींकडे नव्हते.हे देखील वाचाहा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहेमराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिलीपाण्यात उतरलं की पोहता येतंच. भागोजींनी त्यांच्या घराजवळ असलेलं बंदर गाठलं आणि एका तांडेलाला आपल्याकडे पैसे नाहीयेत पण मुंबईला जाणं किती गरजेचं आहे हे पटवून दिलं. ते म्हणतात ना कष्ट करणाऱ्यांना नशीबसुद्धा साथ देतं.
भागोजींना त्या जहाजवरच्या माणसांनी पैसे न घेता सुखरूप मुंबईत नेऊन सोडलं.भागोजी मुंबईत आले तेव्हा केवळ १२ वर्षाचे होते. पैसे मिळवण्यासाठी रोजगाराच्या शोधात फिरताना त्यांना मुंबईबद्दल माहिती व्हायला सुरुवात झाली. भागोजींना शेवटी एका सुताराकडे लाकडाला रंधा मारण्याचे काम मिळाले. त्यावेळी भागोजींना २ आणे रोजाने पैसे मिळत.मग भागोजींनी सुताराला विचारून रंधा मारून निर्माण होणारा भुसा विकण्यास सुरुवात केली. आता त्यांना २ आणे पगार आणि २ आणे भुसा विकल्याचे असे ४ अणे रोज मिळू लागला. अतिशय काटकसरीने पैसे वापरत भागोजी घरी पैसे पाठवू लागले होते.
पुढे त्यांच्या आयुष्यात आलेल्या या व्यक्तीमुळे भागोजींचं संपुर्ण आयुष्यच बदलून गेलं. भागोजींच्या कष्टांना दिशा देणारा तो माणूस म्हणजे पालनजी मिस्त्री.नावातच मिस्त्री असलेल्या बांधकामाच्या व्यवसायात पालनजींचा चांगला जम बसला होता. त्यांनी मुंबईतल्या कित्येक मोठ्या मोठ्या इमारती उभारल्या होत्या. पालनजींना भागोजींचा कष्टाळू आणि जिद्दी स्वभाव प्रचंड भावला होता. पण, त्यांनी भागोजींना आपल्याकडे ठेऊन घेण्याआधी त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं.
मिस्त्रींनी लाकडाच्या भूशात नोटांचं बंडल लपवलं. भागोजींना ते बंडल सापडलं तेव्हा त्यांनी ते पैसे आपल्याला मालकाला इमानदारीने पुन्हा नेऊन दिले.खरंतर ते पैसे स्वतःला ठेवून भागोजी आरामात आयुष्य व्यतीत करू शकले असते. पण खोटेपणा त्यांच्या स्वभावातच नव्हता. त्यांचा हाच प्रामाणिकपणा मिस्त्रींना फार आवडला, त्यांनी त्वरित भागोजींना आपल्याकडे काम दिले.पुढे जाऊन भागोजींना मिस्त्रींनी अनेक कॉन्ट्रॅक्ट दिले. भागोजींनीसुद्धा ते उत्कृष्टरित्या पूर्ण केले. त्यांनी केलेल्या सुरवातीच्या कामाच्या जोरावर त्यांच्याकडे कामाचा लोंढा वाढतच गेला. एकेकाळी कोकणातून मुंबईत पळून आलेला गरीब मुलगा आज एक मोठा बांधकाम व्यावसायिक झाला होता.त्यांनी कितीतरी आकर्षक इमारतींचे बांधकाम केले.
लायन्स गार्डन, सेंट्रल बँक बिल्डिंग, ब्रेबोर्ण स्टेडियम, इंडियन मर्चंड चेंबर्स, स्टेट बँक बिल्डिंग या भागोजींनी निर्माण केलेल्या इमारती आजही मुंबईत दिमाखात उभ्या आहेत.इतकंच काय तर अवघ्या भारतात प्रसिद्ध असणारी मरीन ड्राइव्हची भिंत देखील भागोजींनीच बांधली आहे.भागोजींनी अक्षरशः शून्यातून विश्व उभं केलं होतं. पण नुसते पैसे कमवून ते थांबले नाहीत. त्याचा उपयोग त्यांनी समाजासाठी केला.आळंदीसारख्या पवित्र ठिकाणी धर्मशाळा आणि अन्नछत्र सुरू करणं असेल किंवा आपल्याप्रमाणेच गरिबीमुळे ज्या मुलांना शिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी शाळा, वसतिगृह निर्माण करणं असेल अशी अनेक सामाजिक कामं त्यांनी केली. इतकंच काय तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील भागोजी किरांनी आर्थिक मदत केली होती.सावरकरांनी एक विठ्ठल मंदिर उभारलं आणि तिथे अस्पृश्यांना प्रवेश दिला. हे मंदिर देखील भागोजींनीच बांधून दिलं. २२ मे १९३१ रोजी लोकार्पण केलेलं हे मंदिर पतितांना पावन करणारं होतं म्हणून सावरकरांनी त्याचं नामकरण पतितपावन मंदिर असं केलं.
अस्पृश्यांसह हिंदूंसाठी खुलं असणारं ते पहिलं मंदिर ठरलं.भागोजी किरांनी सामाजिक क्रांतीत देखील हातभात लावला. शिवाजी पार्कवर असणारं सावरकर सदनसुद्धा भागोजींनीच उभारलं पण त्याचे पैसे सावरकरांनी दिले.एकदा भागोजींच्या असे लक्षात आले की दादरसारख्या एवढ्या मोठ्या ठिकाणी एकही स्मशानभूमी नाहीये त्यांनी या गोष्टीवर त्वरित काम केलं आणि स्वखर्चाने सरकारकडून जागा विकत घेऊन स्मशानभूमी उभारली.
अगदी लहानशा खेड्यातून येऊन मुंबईसारख्या शहरात आपलं स्वतःचं विश्व निर्माण करणारे भागोजी किर हे आजच्या मराठी तरुणांसाठी नक्कीच आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. कष्ट आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टींच्या जोरावर भागोजींनी उभारलेले आपलं उद्योगविश्व नक्कीच थक्क करणारे आहे.या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.