
कोकणच्या प्रलंबित प्रश्नांसाठी कॉंग्रेस रस्त्यावर उतरणार, माजी खासदार हुसेन दलवाईया
सरकारकडून कोकणी माणसावर अन्याय केला जात आहे. त्यामुळे येथील मुंबई-गोवा महामार्ग, वाशिष्ठीतील गाळ उपसा, विकासाला खीळ घालणारी निळी व लाल पूररेषा, मध्यवर्ती बसस्थानक असे अनेक प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत. ते कसे करणार हे २० दिवसात सरकार व संबंधित यंत्रणेने जाहीर करावे, अन्यथा कॉंग्रेस रास्तारोको आंदोलन करेल, असा इशारा माजी खासदार हुसेन दलवाई यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.ते पुढे म्हणाले की, गेली १२ वर्षे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले आहे. जे काही काम झाले आहे तेही निकृष्ट दर्जाचे आहे.
त्यामुळे मी नितीन गडकरी यांना भेटून आपण दोघांनी चिपळूण ते मुंबई असा कारने प्रवास करूया, कामाचा दर्जा बघूया, अशी विनंती करणार आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. गरज नसताना खेड व अन्य भागात पूल बांधले आहेत. बहाद्दूरशेखनाका येथील पुलाचा दर्जा यापूर्वीच दिसून आला आहे. त्यामुळे पुलाचे काम कधी होणार, असा सवालही दलवाई यांनी उपस्थित केला.www.konkantoday.com