दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर आता जातीचा रकाना चढला.
राज्य मंडळाची बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेची हॉल तिकिटे कनिष्ठ महाविद्यालयांकडून वितरित केली जात असून, त्यावर परीक्षार्थी विद्यार्थ्याच्या चक्क जातीचा उल्लेख पाहून पालकही चक्रावले. ‘कास्ट कॅटगरी’ म्हणून असा वेगळा कॉलम हॉल तिकिटावर यंदा कशासाठी, असा सवालही पालकांनी आपापल्या मुलांच्या कनिष्ठ महाविद्यालयांना केला.
मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, यंदा मंडळाने हॉल तिकिटात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यावर्षी विषयनिहाय न देता तारखेनुसार कोणते पेपर आहेत, त्याची माहिती हॉल तिकिटावर आहे. शाळेत आपल्या मुलांची कोणती जातनोंदवली आहे, याची माहिती पालकांना व्हावी म्हणून दहावी आणि बारावीच्या हॉल तिकिटावर यंदापासून जात प्रवर्गाचा रकाना सुरू केला आहे. शालेय शिक्षण घेऊन विद्यार्थी बाहेर पडला की, हे बदल करता येत नाहीत. कागदपत्रावर जातीची नोंद चुकीची झाली असेल तर पालकांना शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक कार्यालयातून योग्य ती कागदपत्रे सादर करून तो बदल करून घेता येतो.
जातीची नोंद कोणती झाली आहे हे पालकांच्या लक्षात यावे, हा एकमेव उद्देश त्यामागे असल्याचेही गोसावी म्हणाले. सामाजिक न्याय विभागाला विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी विद्यार्थ्यांची जातनिहाय आकडेवारी द्यावी लागते त्यासाठीही हॉल तिकिटावरील जात प्रयोगाचा उपयोग होईल, असे ते म्हणाले.